संस्कार म्हणजे काय ?
१) संस्काराची व्याख्या
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प (कमी) करायचे.
मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारयुक्त असली पाहिजे. प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे, उदा. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.
२) संस्काराचे प्रकार
मुलांनो, तुम्हाला चांगली व्यक्ती बनायचे असल्याने स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा. चांगले संस्कार आणि वाईट संस्कार यांची काही उदाहरणे पुढे देत आहोत.
अ) चांगले संस्कार :
सकाळी लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशी नम्रतेने अन् प्रेमाने वागणे, स्वच्छता राखणे, नीटनेटके रहाणे, प्रतिदिन शाळेत जाणे, गृहपाठ वेळच्या वेळी करणे, आईला घरकामात साहाय्य करणे इत्यादी.
आ) वाईट संस्कार :
सकाळी उशिरा उठणे, सतत दूरचित्रवाणी (टी.व्ही.) पहात बसणे, अभ्यास न करणे, उलट बोलणे, अस्वच्छ रहाणे, पुस्तकांचा खण व्यवस्थित न ठेवणे, खोटे बोलणे इत्यादी.
संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करावयाचे म्हणजे त्याला 'आई-वडिलांना रोज नमस्कार कर', 'दुसऱ्याची निंदा करू नको' इत्यादी शिकवावयाचे; पण ते कसे शिकवावयाचे - तर तत्त्वज्ञान सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट, आईस्क्रिमची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने. आठ वर्षांच्या मुलांना रोज मोठ्या मंडळींना नमस्कार करावयाची आज्ञा दिलीत, तर ४ दिवस करील. पाचव्या दिवशी सांगेल ''मी नाही करणार.'' त्याला नमस्कार करण्याच्या फायद्यांबद्दल तत्त्वज्ञान सांगितले, तरी उपयोग होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या मुलाने मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, तर एकच उपाय आहे. आजपासून तुम्ही घरातील सर्व वडील मंडळींना रोज फक्त एकदाच नमस्कार करा. मुलाला एकदापण नमस्कार करावयास सांगू नका. चार दिवसांच्या आत मुलगा तुमच्या पाठीमागे येऊन घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करू लागेल. त्याला लाज वाटेल, की माझे आई-बाबा रोज आजी-आजोबांना नमस्कार करतात. मी मात्र बेशरमासारखा उभा आहे. संस्कार करणे म्हणजे तोंड बंद कृती चालू !
३) लहान वयातच चांगले संस्कार करण्याची आवश्यकता
अ) चांगले संस्कार झाल्याने जीवन आदर्श बनते :
पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत, त्यांना प्रतिदिन (दररोज) वंदन करत. जेवण्यापूर्वी श्लोक म्हणत. सायंकाळ होताच हात-पाय धुऊन देवासमोर दिवा लागल्यावर स्तोत्रे म्हणत. रात्री लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत. अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असत. मुलांनो, तुम्हाला आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वांनी ओळखावे, असे वाटत नाही का ? आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्ही गुणी व्हायला हवे. चांगले संस्कार झाल्यावर तुम्ही गुणी आणि म्हणून आदर्श व्हाल.
आ) चांगले संस्कार झाल्याने जीवन आनंदी बनते :
आई-वडिलांचे ऐकणे, मोठ्यांचा आदर करणे, देवाची भक्ती करणे इत्यादी संस्कारांमुळे देवाचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदी बनते. याउलट दुसर्यांची टिंगलटवाळी करणे, मोठ्यांशी उद्धटपणे बोलणे, खोटे बोलणे इत्यादी कुसंस्कारांमुळे पाप लागत असल्याने जीवन दुःखी बनते.
इ) आदर्श पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो :
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे हिंदवी स्वराज्य स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही आदर्श बनलो, तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल.
सुसंस्कारांचे महत्त्व !
१) सुसंस्कारित मन जिवाला भरकटू देत नाही !
'सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. देवाने दिलेली ही समष्टी सेवा आहे; पण हे समाजाला कळत नाही आणि तो भरकटलेल्या तरुण युवकांप्रमाणे दूरदर्शनाच्या, त्यातील अनावश्यक मालिका यांच्यात वहावत गेला आहे.
२) कुसंस्कार होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वत्र फोफावलेला चंगळवाद
'आम्हाला कोठे हे लहानपणी मिळाले ? आम्ही पूर्ण बालपण मोठ्यांच्या कह्यात राहून मन मारले. आता मिळतेय ते आधाशासारखे खाऊया. मनाप्रमाणेच करूया', हे विचार लोकांच्या मनात प्रबळ असतात. असे कुसंस्कारित मन पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार ? त्यामुळेच पुढची, म्हणजेच आताची पिढी पूर्ण भरकटली गेली आहे. त्यातच प्रसारमाध्यमे, रस्त्यावरही सहजपणे दिसणारी अयोग्य विज्ञापने, भ्रमणभाष, ई-मेल, फेसबूक अशी अनंत आधुनिक साधने सहजपणे उपलब्ध झाल्याने त्यात भरच पडली आहे. त्यातून योग्य ते शिकण्यापेक्षा नको त्या मार्गाला नवीन पिढी वहावत चालली आहे. प्रत्येक सुसंस्कार आपणास देवाकडे नेतो; पण कुसंस्कार असुरांच्या राज्यातच नेऊन सोडतो आणि अराजकही माजवतो. तेच आज आपणाला सर्वत्र दिसत आहे.
३. समाजाला आज सुराज्याची आवश्यकता आहे !
समाजाला आज पाहिजे आहे एक सुराज्य. त्यात असेल धर्माचरण. राष्ट्र, धर्म, देव यांना मानणारा आदरणीय समाज. तोच या युवा पिढीला सन्मार्ग दाखवील. यासाठीच सनातन संस्था आणि काही हिंदुत्ववादी संघटना सतत कार्यरत आहेत. त्याच समवेत पाहिजे देवाचे अधिष्ठान. समर्थ रामदासांनी म्हटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥ तेच सात्त्विक काम सनातन संस्थेचे संस्थापक परात्परगुरु प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले करत आहेत. त्याला अनेक संत आणि साधक हातभार लावत आहेत.
४. पुढची पिढी सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी सत्सेवा !
नागरिकांनो, आदर्श राज्य येणारच आहे; पण त्यासाठी पुढची पिढी सुसंस्कारित व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जसे श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचललाच होता; पण त्यात स्थुलातून प्रत्येक गोप-गोपी काठी लावून सहभागी झाले होते, तशीच स्थिती आजही आहे. आपल्यालाही तेच कार्य करून केवळ हातभार लावण्यास सज्ज व्हायचे आहे. 'चला सिद्ध होऊ या पुढची पिढी सुसंस्कारित करायला ! तीच आपली सत्सेवा आहे. हे लक्षात घेऊया.'
सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे
सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे
भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक जिवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुख संस्कार सांगितले आहेत. या संस्कारांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
१. बीजदोष न्यून करण्यासाठी संस्कार केले जातात.
२. गर्भदोष न्यून करण्यासाठी संस्कार केले जातात.
३. पूर्वजन्मांतील दुष्कृत्यांमुळे देव आणि पितर यांचे काही शाप असल्यास, त्यांची बाधा अल्प करण्यासाठी, देव अन् पितर यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि कुलदेवता, इष्टदेवता, मातृदेवता, प्रजापति, विष्णु, इंद्र, वरुण, अष्टदिव्पाल, सवितादेवता, अग्निदेवता इत्यादी देवतांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी संस्कार केले जातात.
४. मुलगा आरोग्यवान, बलवान आणि आयुष्यमान होण्यासाठी संस्कार करतात.
५. मूल बुद्धीवान, सदाचारी, धर्माप्रमाणे आचरण करणारा होण्यासाठी संस्कार करतात.
६. आपल्या सत्कृत्याने आणि धर्मपरायण वृत्तीने आत्मोन्नती करून आपल्या वंशाच्या पूर्वीच्या बारा अन् पुढील बारा पिढ्यांचा उद्धार करण्याची क्षमता मुलात येण्यासाठी संस्कार करावेत.
७. स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून ब्रह्मलोकाची प्राप्ती किंवा मोक्ष मिळवण्याची क्षमता येण्यासाठी संस्कार करावेत.
८. सनातन धर्माप्रमाणे प्रत्येकाची प्रत्येक कृती आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संस्कारसुद्धा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी असतो; कारण परमेश्वराची कृपा असल्यासच आपली उद्दिष्टे पुरी होऊ शकतात.
हे सर्व संस्कार मुलाच्या आई-वडिलांनी आणि गुरूंनी करावयाचे असतात.
द्रव्यावरील आयुर्वेदातील संस्कार
द्रव्यावरील आयुर्वेदातील संस्कार
कोणत्याही द्रव्यावर त्याचे गुण पालटण्यासाठी, म्हणजेच वाईट गुण आणि त्यांचे शरिरावरील कार्य अल्प किंवा नाहीसे करून चांगले गुण अन् कार्य वाढवण्यासाठी करावयाची जी क्रिया, तिलाच ‘संस्कार’ असे म्हणतात.
‘संस्कारो हि गुणान्तराधानं उच्यते ।’
- चरक सूत्रस्थान २६-३४
|
संस्कार म्हणजे पवित्रता, शुद्धता, स्वच्छता. अन्न शिजवल्यामुळे (अग्नीसंस्कारामुळे) पचवता येते. औषध खलल्यामुळे सूक्ष्म होते आणि अधिक गुणवान होते. मर्दनं गुणवर्धनम् ।
जमालगोटा (जयपाळ) हे एक रेचक औषध आहे. त्याला इंग्रजी भाषेत ‘क्रॉटन पॉलिअॅन्ड्रम’, असे म्हणतात. रेच होत असतांना पोटांत मुरडा होतो. जयपाळ लिंबाच्या रसातून खाल्ल्यास मुरडा होत नाही. याला संस्कार असे म्हणतात.
जड वस्तूंवरील संस्कार
जड वस्तूंवरील संस्कार
दगडातून मूर्ती बनवण्यासाठी शिल्पकाराला दगडावर हातोडा मारून दगडाचा नको असलेला भाग काढून टाकावा लागतो आणि नंतर छिन्नीने कोरीव काम करावे लागते. असे आघात सहन करूनच, म्हणजे संस्कार होऊनच दगडाला देवत्व प्राप्त होते. याचप्रमाणे प्रत्येक माणसाचे पूर्वी मनुष्ययोनीत अनेक वेळा जन्म झाले असतांनाही त्याला परत शिकवावे लागते आणि त्याच्यावर संस्कार करावे लागतात.
एखादा माणूस जन्मापासून अरण्यात राहिला आणि माणसांच्या संपर्कात आलाच नाही, तर तो कधीच बोलू शकणार नाही. घरातील माणसांचे बोलणे ऐकून आणि त्यातील भाव समजून मूल हळूहळू बोलायला शिकते. पूर्वीच्या जन्मात तीच भाषा असेल, असेही नाही. भाषा नवीन असल्यास मनालाही भाषेचा अभ्यास करायला वेळ लागणे स्वाभाविक आहे. तीच भाषा असली, तरी भाषेतही पालट होत असतात. ६०० वर्षांपूर्वीची मराठी भाषा आज पुष्कळ पालटलेली आहे.
मनाची अभिव्यक्ती मानवी मेंदू आणि शरिरातून होत असल्याने देहाच्या कृती अन् कौशल्यासह मनाचे विचार आणि कुशलता अधिकाधिक व्यक्त होतात.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे बाहेरच्या उपकरणांत, तंत्रात आणि सुविधांमध्ये विशेषतः गेल्या शतकात पुष्कळ पालट झाला आहे. ६०० वर्षांपूर्वी जन्म झालेल्या माणसाचा आता परत जन्म झाल्यास दूरचित्रवाणी, विमान, संगणक इत्यादी पाहून आपण स्वर्गात जन्म घेतला आहे कि काय, असे वाटेल आणि याविषयाची माहिती, त्यांचे तंत्र अन् त्याविषयीचे शिक्षण घ्यावे लागेल. अध्यात्मशास्त्र परिपूर्ण असले आणि त्यात काही पालट झालेला नसला, तरी अध्यात्मशास्त्र समजण्यासाठी त्याला विज्ञानाच्या शोधाचा पुष्कळ उपयोग होईल. तसेच अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी पूर्वीची उदाहरणे न देता आधुनिक उदाहरणे द्यावी लागतील. नवीन देहासह मनालाही चालायला, बोलायला शिकावे लागते. समजा ज्या घरात जन्म झाला आहे, त्या घरातील माणसांना बोलतांना शिव्या द्यायची सवय असेल, तर तो मुलगा शिव्या द्यायला शिकेल. जेथे नामस्मरण, भजन, कीर्तन चालू असते, अशा घरात जन्म झाल्यास त्याला नामजप करण्याची सवय लागेल आणि त्याच्यावर चांगले संस्कार होतील.
त्यासह पूर्वजन्मीचे शिक्षण आणि संस्कार यांचाही या जन्मी लाभ होत असतो, उदा. पूर्वीच्या जन्मी एखादा माणूस संगीतज्ञ असेल, तर या जन्मी संगीत शिकतांना त्याची फार थोड्या वेळात विलक्षण प्रगती होईल. पूर्वीच्या जन्मात अध्यात्मशास्त्रात पारंगत असल्यास या जन्मात त्याला पहिल्यापासून अध्यात्मशास्त्राची आवड असेल. आदि शंकराचार्य वयाच्या ८ व्या वर्षी वेद शिकवत असत आणि त्यांचा अर्थ समजावून सांगत असत. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे.
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽपि जायते ।
या जन्मात सिद्धावस्थेस न पोहोचलेला योगी किंवा साधक मृत्यूनंतर सात्त्विक किंवा ऐश्वर्यवान माणसांच्या घरी जन्म घेतो. सर्वसाधारणपणे बर्याच संतांचे जन्म आध्यात्मिक वातावरण असलेल्या घराण्यात झालेले आहेत.
घरात दारू किंवा सिगारेटचे व्यसन असलेली माणसे असतील, तर पूर्वी दारू किंवा सिगारेटचे व्यसन असलेला जीव त्या घरात जन्म घेईल. याउलट घरात सात्त्विक वातावरण असेल, तर एखादा पुण्यात्मा अशा घरी जन्म घेईल; म्हणून आपली मुले चांगली व्हावीत, असे वाटत असेल, तर आपण सात्त्विक आहार-विहार, आचार आणि विचार करण्यास शिकले पाहिजे अन् आपण स्वतः सात्त्विक प्रवृत्तीचे व्हावयास हवे.
No comments:
Post a Comment